Tuesday, February 7, 2023

खिडकी

बयो, 
अनावधानाने काल तुझ्या खोलीत आले... हो अनावधानानेच...( कसलं तुझं माझं म्हणून हसू नकोस आता) देव जाणे कसल्या तंद्रीत वावरत होते पण तुझ्या खोलीतल्या तुझ्या खिडकीत येऊन बसले आणि अन क्षणात जागी झाले बघ... तुझ्या खोलीतली तुझी खिडकी... उभ्या लोखंडी गजांची ... लाकडी तावदानांची .. तुझी लाडकी खिडकी अन त्याला लागून असलेला लाल मातीतला उबदार कट्टा.... 
मला आठवतंय हे घर बांधायला घेतलंस तेव्हा एकदाच म्हणालेलीस, एक खिडकी हवी गं इथे.. जगाकडे पाठ करून निसर्गात रमून जायला.. बाहेरचे कोलाहल मिटवून आतली शांतता अनुभवायला एक खिडकी हवीच.. किती सुंदर दिसत होतीस तू हे सांगताना बयो.. ह्या खिडकीतून दिसणारे अगणित ऋतुसोहळे तुझ्या नजरेने असंख्य वेळा अनुभवलेत ते उगाच नाही ना.. 

खिडकीत आले अन् समोर दिसला नखशिखांत बहरलेला पारिजात..पहाटेच्या ओल्या धुक्यात चांदणं ल्यालेला देखणा पारिजात... तुझ्यासारखा... तुला सांगू fairy tales बघत मोठ्या झालेल्या आपल्यासारख्या मुलींची स्वप्नं पण fairy tale सारखी नाजूक, गोड गोड असतात ना गं.. आता हेच बघ, हा पारिजात बघितला आणि उगाच आपलं मनात आलं की पहाटेच्या  दव भरल्या शांत प्रहरी हा  पारिजात कोणीतरी तितक्याच निर्मळतेने उधळावा आपल्यावर... किमान प्रेमाने ओंजळीत तरी भरावा ना गं कोणीतरी.... हसू नकोस गं तूपण.. बालिशपणा वाटत असेल सगळा पण.. पण म्हणाले ना fairy tales.. जाऊ दे..बयो तुला माहितेय? तुझ्या ह्या खिडकीतून सकाळच्या उन्हाची एक कोवळी तिरीप आत येते अन सोबतीला असतात ते असंख्य चमचमणारे क्षण... पिवळ्याधम्म उन्हाचा तो तुकडा जमिनीच्या लाल मऊशार कोब्यवर विसावला की का कोण जाणे पण  हात आपसुकच जोडले गेले.. उगाच पवित्र वाटून गेलं...तुला आठवतंय ह्या खोलीच्या जागी देवघर करायचं मनात  होतं आम्हा सगळ्यांच्या पण का कोण जाणे तिथे तूच असावीस असा हट्ट होता तुझा.. कधीही कसलाही हट्ट ना करणारी तू म्हणून तुझी ही इच्छा सगळ्यांनी मान्य केली... काल अख्खा दिवस इथेच रेंगळल्यावर रात्र आपसूकच खिडकीत बसून सरली अन तुझ्या एकमेव हट्टा मागचा उद्देश  लख्खपणे कळला बयो.. तुझ्या खोलीच्या ह्या खिडकीतून बयो परसदारची विहीर दिसायची... रात्रीच्या काळ्या अंधारात अजूनच गूढ दिसणारी खोल विहीर...अर्थात तू आम्हा कोणाला कधी तिकडे फिरकू दिलं नाहीस पण ... पण तुझ्या आधाराला येणारे,  हरवलेले, कोलमडलेली माझ्यासारखे बरेचशे अन प्रत्येकाच्या मनातल्या असह्य प्रश्नांवर उत्तर म्हणून उभी होती ही विहीर हे आम्हा सगळ्यांनाच ठाऊक होतं गं ...कदाचित तुलाही... तुझा  ह्या खोलीचा.. ह्या खिडकीचा हट्ट आज पूर्णपणे कळला बयो...ह्या खिडकीत बसले अन बघ मला मी तु झाल्यासारखी वाटले.. हसू नकोस पण खरचं..ह्या खिडकीतून दिसणाऱ्या ऋतूंचे अगणित सोहळे तुझ्याच नजरेने बघितले असतीलही पण आज इथे बसून ते अनुभवताना तू उमगते आहेस बयो नव्याने...

Sunday, May 1, 2022

गाभारा

अगदी परवाचीच गोष्ट असेल बयो, उन्हं उतरणीच्या वेळी आपल्या डोंगरावरच्या मंदिरात गेले होते... म्हटलं तर अगदी सहजच अन नाही  तर जरा एकटेपणा अंगावर आला म्हणून देवाचा आधार शोधायला... तर उतरणीची ती सोनेरी उन्हं अन आपलं काळ्या पाषणातलं शांत थंडगार मंदिर.. सोबतीला गाभाऱ्यातला देव अन माझ्यासारखीच काही तुरळक एकेकटी बेटं... आधार शोधणारी... उन्हं परतून अंधार वस्तीला यायला लागला अन पुजारी बाबा नी दिवे उजळले... आस्तिक नस्तिक्तेच्या पल्याडची अनुभूती असते ना गं ही दिवेलागणीची..   शांततेत तेवणाऱ्या समयीकडे बघितलं की च अर्धे ताण आपोआप निवळून जात असतील ना... यथावकाश आरती सुरु झाली, त्याची लय सोबतीला घंटानाद... ना धड अंधार ना उजेड अन त्यात त्या आरतीच्या पिवळसर तेजात उजळलेला गाभारा... नेमका कसला परिणाम नाही ठाऊक पण ह्या अशा अद्वैताचा वेळा मुळापासून मोडून टाकतात स्वतः भोवतीचे कणखरतेचे पाश अन मोकळे होत जातात एकेक भाव... पाझरू लागतात डोळे कुठल्याश्या आश्वासक भावनेने... नाद भिनत जातो रुजत जातो खोलवर... अंधार अजूनच गडद होत जातो... एकसंध होत जातो अन् नेमका तेव्हाच गाभाऱ्याच्या तोंडाशी कर्पुर आरतीचा लोळ घेऊन पुजारी प्रकाश वाटत असतो... मनावरची काळखोची साय झटकायला जो तो त्या प्रकाशाला ओंजळीत घेत असतो... अंधाराचं साम्राज्य वाढत जाणार असतच पण पुजरीबाबाने चारही दिशांना दिलेलं ते आरतीचं तेज किमान काही क्षण तरी उभारी देऊन जातं... अदृश्याच ओझं दृश्य गाभाऱ्यात टाकून पुन्हा नव्या पहाटेच्या प्रतीक्षेत परतले मी पुन्हा तुझ्या घरी... तुझ्या प्रतीक्षेत... सृजनाच्या प्रतीक्षेत.... पहाट घेऊन येशील ना?

Sunday, April 3, 2022

भीती

जवळच्या व्यक्तींना गमावण्याची एक अनामिक भीती आपल्या सगळ्यांच्याच मनात  असते नं  बायो.. कि अवेळी कोणाला गमावलं, कि हि भीती जास्त पाठलाग करायला लागते.. हम्म.. तसं अवेळी म्हणणं पण कितपत बरोबर कोणास ठाऊक.. जिवलगांना कायमचं  गमावण्याची खरंतर कोणती योग्य वेळ असते ? नाहीच नं? इतर असंख्य भल्या बुऱ्या  क्षणांची  मनातल्या मनात कित्येकदा उजळणी करतोच आपण पण, कितीही  विधिलिखित असलं तरी एका   जिवंत व्यक्तीच्या नसण्याचा मात्र धक्काच बसतो अन ह्या नसण्याची  सवय ?? ती काही होता होत नाही.. 
अजून अशा किती क्षणांची  बेरीज शिल्लक आहे हे ठाऊक नसताना कातरवेळी उगाच आठवतात  गमावण्याच्या भीती चे एकूण एक वांझोटे  क्षण.. हळवेपण पुन्हा एकदा ओसरीवर ठाण मांडून असतोच  आणि उंबऱ्याच्या आत जीवाची तगमग संपता संपत नाही...  मनाला ठाऊक असतात गं ह्या अनाठायी भीतीला शांत करण्याचे मोजके मार्ग पण कधीतरी नाहीच जमत... नाहीच जमत हि उगाचची घालमेल  शांत करणं ... वेळीअवेळी उगाचच मग दाटून येतो एक हुंदका कितीही अडवलं तरी .. पाणवल्या  डोळ्यांनी  दिसत राहतं  सारं धूसर धूसर.. त्या पाणवठयाची  ओल  मग झिरपत जाते  खोल खोल.. अन रुजत जातो नव्या भीतीचा एकेक नवा दुवा अलगद हळुवार   ... खरंतर नसतंच समजून घायचयं काहीही अशावेळी .. अगदी सगळं पटत असलं तरीही ... हवा असतो हट्ट जरावेळ ह्या घाबरट जीवाला  कुरवाळण्याचा ...  झरू द्यायचे असतात कढ दाटून आल्या भीतीचे ...  अन वाट पाहायची असते भीती  पल्याडच्या क्षणांची ... कितीही  अनाठायी असली तरी हि गमावण्याची, हरवण्याची भीती  जगायला शिकवतेय बयो... फक्त कोणासाठी तरी ह्या गमावण्याच्या भीतीचा चेहरा आपला असावा हीच अपॆक्षा .. फार नाही ना गं मागणं  ??

Tuesday, January 18, 2022

माऊली

खरेपणाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते ना बयो... म्हणजे बघ पुढची दिशा सापडेपर्यंत तुझ्या घरात रेंगाळतेय मी हे माझं खरं ,पण जगाच्या मते मी तुझ्या घरावर हक्क सांगतेय.. हेही त्यांच्यासाठीचं खरं आहेच ना...कोणाच्या घरावर खरंच असा हक्क सांगत येत असेल का गं? म्हणजे त्या वास्तू वर गाजवता येत असेलही कदाचित पण घर?? ते तर तुझं च असले न कायम.... नक्की हसशील हे वाचून आणि म्हणशील, अगं तुझं माझं असं काही वेगळं असतं का... आणि इथवरच्या प्रवासात इतकं सारं गमवल्यावर अजून कशा कशावर हक्क सांगायचं सोस उरेल का गं.. नकोच ते..  हे घर म्हणजे फक्त आसरा..काही क्षणाची विश्रांती.. भिरभिरल्या मनाला वाटेला लागेपर्यंतचा थांबा एक.. इथे कायमचा मुक्काम कोणाचा नाही.. जिथे उद्याचा भरोसा नाही तिथे कसल्या ग हक्काच्या बाता... बघ तुझ्या घरात अगदी तुझ्यासारखं बोलायला लागले.. तुझ्यासारखं लिहायला लागले.. आस एकच.. कधीतरी तू परतून आल्यावर माझ्या ह्या असण्याला तुझा स्पर्श व्हावा.. तू म्हणायचीस बघ... रिकाम्या वास्तुतही शब्द असतात आवाज असतात... सूर असतात.. ऐकणारा फक्त एक कान हवा....
अरे हो तुला सांगायचं राहिलंच काल पहाटेस जाग आली ती मधुर सुरांनी..अगदी जवळ आपल्या अंगणात कोणीतरी अवीट भक्तीने गात होत बहुदा.. सुरुवातीला जरा गडबडले, घाबरले सुध्दा म्हणजे बघ ना मी इथे तुझ्या आडोशाला इतके वेळा आले की आता नाही म्हणाले तरी हा परिसर ,शेजार ओळखीचा झालाय. आणि त्यापैकी आजवर  असं इतकं आत कोणीच आलं नव्हतं..अंगणाची वेस सहसा कोणी ओलांडली नाही हो नं?म्हणून तर गोंधळलेल्या मनाची नीट उस्तवार करायला तुझ्या घरी कायमच एकांत मिळत आलाय आणि आज पहिल्यांदा हा आवाज... आवरून बाहेर आले आणि समोर दिसला तो.. पोरसवदा किंवा त्याहीपेक्षा लहानसा तो.. आणि कानावर आली त्याची हाक.." माऊली".. 
माऊली घाबरु नका पहाटेसच आलोय.. तुमच्यासारखाच मीपण एक वाटसरू.. माऊलींच्या घराचा आसरा घ्यायला आलोय... गंमत वाटली बघ मला... म्हंजे बघ ना मघशी तुला हक्काच्या गोष्टी सांगत होते आणि हा आला तुझ्या.. माझ्या बयोच्या आणि त्याच्या माऊलीच्या घरावर हक्क सांगायला... हसूच आलं एकदम तसा तोही हसला.. निर्मळ हसू... म्हणतो कसा, माऊली वाट दिसेल तिथे माझा मार्ग, आभळातल्या देवावर श्रद्धा आणि त्याच्याच कृपेने ही भटकंती.. हा उत्सुकतेचा प्रवास...वहीवाटेचा मार्ग आहेच हा मार्ग हरवला तर मग तोवर नवे मार्ग शोधायला काय हरकत.. माऊली प्रवाही असायला हवं जगणं हो नं.... नाविन्याची ओढ असायला हवी.. विसावा हवा प्रवासात मान्य पण त्यालाही वेळेचं बंधन हवं माऊली.. कौतुक वाटलं गं आणि नकळत तुलना ही आली मनात... हो स्वत :शीच तुलना...
 सकाळ झालीय बयो आता... निघायला हवं आता... विसावा संपवून नवी वाट शोधायला हवी आता... उत्सुकतेेची पाऊलवाट... येतेस??

Sunday, July 25, 2021

वेळीअवेळी माझं तुझ्या दाराशी येणं तुला तसं नवीन नाही बयो अन माझ्यासाठी मात्र काहीच जुनं उरत नाही... दरवेळी नवीन ठेच अन नव्याने धडपडलेली मी.. तुझ्या कायम उघड्या दारासमोर उगाच खोळंबलेली..
 मला न कायम कुतूहल वाटत आलंय.. तुझं.. तुझ्या घराचं... ह्या घराच्या ह्या अशा सताड उघड्या आपलेपणाचं... आणि खर सांगायचं तर थोडी असूया सुध्दा वाटतं तू नसताना तुझ्या घरात पावलोपावली तुझा दरवळ जाणवण्याची... घर नवीन नसलं तरी दरवेळी कुठल्या तरी नव्या वळणावरून परतलेली किंवा नव्या वळणाशी अडखळलेली  मी नवीच असते... नव्याने घुटमळते दाराशी... तुझी वाट बघत... 
आत्ताही बघ न बाहेर हा असा अविरत कोसळता पाऊस... मिट्ट काळोखातही त्याची ओल खोलवर झिरपतेय.. दिसत नसला तरी पाऊस असतोच ग कायम सोबतीला.. पडवीच्या खिडकीत बसून ह्या पावसाचे किती अगणित सोहळे बघितले असतील नं आपण.... फक्त पाऊसच का सहा ऋतुंच्या असंख्य तऱ्हा निरखल्या.. अनुभवल्या त्या इथूनच ना ग..... ग्रीष्मातली  सोनेरी उन्हं, शिशिरतली धुक्याची मऊ चादर अन भर आषाढातला हा हिरवागार पाऊस...अंगण अन घराची वेस सांभाळत किती गुजगोष्टी ऐकल्या असतील न ह्या खिडकीने.. किती अवघड वेळा लीलया पेलल्या असतील.. खरंतर तुझ्या घरात अवघडलेपण नावालाही नसावं... पण तरी हा बाहेरचा अक्राळ विक्राळ पाऊस बघताना घाबरायला होतंच अन त्यातच आपलं खुजेपण जास्तच अधोरेखित होतं हो नं?
दर खेपेला एक नवीन गुपित अन एक नवीन मुखवटा लेऊन तुझ्या पुढ्यात उभं राहिलं की तुझ्या डोळ्यातली आश्वस्त ओळख  सहज वाचता येतं अन इथून परतताना हीच ओळख नव्या रस्त्याचं भान देते बयो...
स्वतः लाच लख्ख आरशात बघतोय असा भास म्हणजे तू  बयो...  अन तू नसताना तुझं घर म्हणजे हा आरसा असतो बघ.. पावसाचं प्रतिबिंब उतरतात  ह्या घरात... तुझं घर पाऊस होतंय बायो... नितळ सरींचा अविरत  बरसणाऱ्या पावसाचं घर म्हणजे तू... अशा असंख्य पाऊसवेणा विणता विणता अंधार सरतोय बयो... पाऊस असेलच पण सोबतीला  सृजनाची ओली पायवाट दिसेल आता... काळोखाच्या ह्या उंबरठयावरून आता पुढचा प्रवास सरेल बयो अन चुकलच वळण तर परतायला तू आहेसच.. असावीस.. कायम...

Tuesday, March 2, 2021

जाणीव

उपरेपणाची जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललीय बयो... आपल्या असण्याची, जगण्याची मुळं कुठेही रुजू नये असं कसं गं नशीब... जराही रेंगाळायला नको.. अडखळायला नको किंवा अगदी गुंतयलाही नको पाऊल कुठे असा गं कसा उफराटा प्रवास हा... भर मध्यान्हीचा प्रवास असावा हा. उगवतीचा अन मावळतीचा सूर्य अगदी समान अंतरावर... समान जागांवर.. दोन्हीकडे धरणीत रुजलेले .. मध्यान्ह पुन्हा उपरीच... सायं पहाटेच असणं जितकं हवसं तितकंच मध्यान्ह नकोशी..तरीही  मागे परतणं शक्य नाही अन् पुढे सरकणं अटळ.. तितकंच निर्विकार...नेमक्या  कुठल्याश्या निर्धाराने  मध्यान्हीचा प्रवास मावळतीला संपून पुन्हा पहाटेची रुजवात करतो  हे उलगडायला हवं बयो.. तिथेच कुठेतरी हे उपरेपणाचं कोडं उलगडेल...


कुठे रुजू नये मूळ, न कुठे फुलवा बहर
सरे कोडगा प्रवास जगण्याचा.

Sunday, August 16, 2020

पाऊस

आणि मग कधीतरी मध्यरात्री थांबतो पाऊस.. दिवसभराची रिपरिप, झिरझिर, क्वचित पावसाची संततधार रात्रीच्या काळोखात आसऱ्याला येते... आणि सोबतीला असते निरव शांतता.... शहरातला पाऊस आपल्या वाट्याला येतो तो असा रात्री....गावच्या अंगणातल्या चिखलात दिवसभर लोळलेला, छतावरल्या कौलांतून तिन्हीसांजेला ओघळलेला, पानाफुलातून बहरलेला पाऊस शहरात भेटतो तो पार्किंमध्ये  मध्ये साचल्या डबक्यात... दिवसभर बंद काचेच्या पल्याड त्याच्याच नादात बरसणारा पाऊस भर रात्री  गॅलरीच्या काठड्यावर विसावत जातो.. स्ट्रीट lamp च्या शेडवरून ओघळणारा पाऊस शहरात रुजत जातो... शांतावत जातो... काळवेळाचं गणित विसरून रात्रही पावसाला कवेत घेते...अन अजूनच काळी भिन्न होते... गुजगोष्टी रंगत जातात...  शांततेत रंग भरले जातात... अन् रात्रीच्या काळोखाची गाणं होऊन जातं... उत्तररात्री कधीतरी मग पुन्हा भरून येतं... गावाकडच्या आठवणींनी शहर गारठून जातं... प्रकाशाच्या उंबरठ्यावर मग पुन्हा पाऊस झरू लागतो... अन् पहाटेच्या वेशीवर पुन्हा शहर जागं होतं जातं

खिडकी

बयो,  अनावधानाने काल तुझ्या खोलीत आले... हो अनावधानानेच...( कसलं तुझं माझं म्हणून हसू नकोस आता) देव जाणे कसल्या तंद्रीत वावरत होते पण तुझ्या...