Sunday, January 28, 2018

आरसा

जानेवारी महिना संपत आला कि हटकून आठवतात ते नवीन वर्षीच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात केलेले संकल्प, आणि सोबतच लक्षात येतो त्यांचा उडालेला बोजवारा हा नं? वाचायचं राहून गेलेले एखादं पुस्तक, बरेचशे सिनेमे ते पार वाढता वाढता बरीचशी मजल गाठलेलं वजन.. काय काय गमतीशीर संकल्प असतात नं. आणि ते पूर्ण नं होण्याची ग्वाही अगदी २ तारखेलाच मिळालेली सुद्धा असते तरी आपण दरवर्षी संकल्प करतोच.. ह्या सगळ्यात यंदा माझा मलाच भेटण्याचा संकल्प होता.. म्हणजे आहे...
           कशी गंमत असते बघा.. आपण सगळेच म्हणजे माझ्या पिढीचे सगळे सतत धावत असतो. जॉब , पैसा, घर, स्टेटस वगैरे... पण ह्या सगळ्यात आपण आपल्याला भेटतो का? म्हणजे माझ्यासारखे कितीतरी साधं फिरायला जातानाही कानात हेडफोन कोंबतात. गाडी चालवतानाही गाणी असतातच सोबतीला. मग स्वतःला भेटायचं तरी कधी. यांत्रिकतेने पुढे जातोय सगळे, एकेक पायरी चढत , पळत, ठेचाळत. पण क्षणभरही न थांबता. युहीं कभी किसी अपने ने कहाँ था, डर लगता है इस मुलाकातसे .. अपने आपसे... आँख चुराकर बस जी रहे है... खुदी की तलाश अब हमसे न हो पायी.. धायमोकलून रडायचंय , खळखळून हसायचंय, जीवापाड प्रेम करायचंय, मिट्ट काळोखात घाबरायचं... पण.. पण आजकाल भीती वाटते ते क्षणभरही एकटंअसण्याची.. निवांत असण्याची.. पिकनिकलासुद्धा शेड्युल मध्ये बांधणारी पिढी आमची मग कशी भेट होणार स्वतःशी.. म्हणून हा संकल्प.. माहितेय दरवर्षी मोडतो तो पण तरी दरवर्षी नव्याने जगतोही.. कोई गल नहीं.. एकच तर महिना संपतोय अजून अख्ख वर्ष आहे.. कुठे तरी कुठल्या तरी वळणावर होईलच हि भेट नक्की.. स्वतःशी...

        

Wednesday, January 17, 2018

शाम से आँख में नमीं सी है

               दिवस असा उतरणीला लागला कि प्रवास नकोसा होतो बयो. एक अनामिक ओझं मानगुटीवर असण्याचा भास सतत छळत असतो बघ. त्यात भर म्हणजे आजूबाजूचं सगळं जग विसाव्याला पोहोचत असताना तुम्ही मात्र कुठल्याश्या अनोळखी जगातून अधांतरी प्रवास करत असता. आणि हा प्रवास तुझ्यापर्यंत घेऊन येणार असेल तर मग विचारायलाच नको. आपलं इथे  कोणीही नसण्याची अधांतरी जाणीव दुपटीने अधोरेखित करणारा हा हरवलेला प्रवास...तू निघून गेल्यानंतर माझंच घर शोधताना आजही तितकंच हरवायला होतं मला.. इतकं कसं ग परकं होत गेलं सगळं.. अचानक कि अगदी सवडीने अनोळखी होतं गेले मी मलाच...मलाच न कळणाऱ्या वेगानं. तसं तर मला न उमगलेलं बरंच मोठं ओझं घेऊन तुझ्याच उंबऱ्याशी थबकलेय आज ...तुझी परतण्याची वाट बघत.. आणि  स्वागताला नेमकी हि कातरवेळ... जीवघेणी.. अस्वस्थ.. हुरहुरती शापित कातरवेळ.. घराघरातून दिवेलागण होत असताना मी मात्र उंबरठ्यातच अडखळलेली... शुभंकरोतीचे सूर आजूबाजूला ऐकू येत असताना माझ्या काळजात मात्र जीवघेणी  भैरवी निनादतेय. पाणावलेल्या डोळ्यांना अंगणातूनच जाणवतेय ती  घरभर पसरलेली उदासीनता, दिवेलागणीला बगल देऊन सरळ घरात घुसलेला अंधार आणि सोबतीला आजूबाजूचे सगळे कोलाहल दूर सारून जीव कासावीस करणारी शांतता.. बयो असं दिस कलल्यावरचं एकटेपण नको ग पदरात टाकूस...
             माझ्या येण्याने घराला आलेली  जाग शेजारच्या घरानीही टिपली असावी कदाचित म्हणूनच कोणा बाईमाणसाची चाहूल समोरच्या ओट्यावर पाण्याची कळशी आणि कपभर दूध ठेऊन अलगद विरून गेली... आणि तिच्याही नकळत मला जागं करून गेली.. चाचपडणारी पावलं नकळत माजघराकडे वळताहेत आता आणि त्याही पल्याड असलेलं तुझं देवघर तितक्याच आर्ततेने ओढ लावतंय...अवघा काळोख दाटून आलाय.. गर्द रात्रीचा कुठलासा प्रहार हा.. जो तुझ्या नसण्याने जरासा लांबलाय.. देवघरात मंद तेवती समयी आणि कधीकाळी गंधाळल्या धुपाचा घुटमळता सुवास... ग्वाही देताहेत तुझ्या असण्याची...तुझ्या सोबतीची... घरभार पसरल्या निराशेचा हाच काय तो दिलासा गं बयो...बस हि रात्र मात्र आता सराया हवी... कुठल्याश्या सांजेला सुरु होणारा हा अधांतरी प्रवास पहाटेच्या वेशीवरतरी किमान संपायला हवा... अन संपता संपता हरवलेलं सारं सारं मला तुझ्या ओंजळीत गवसायला हवं बयो..  त्यासाठी का असेना तुला परतायला हवंय बयो.. परतायला हवंय..



Wednesday, January 10, 2018

Comfort zone

         माणसांनी भरगच्च  भरल्या घरातली ती एक खिडकी... गावाकडच्या वाड्यातला अंगणातला पार... शाळा कॉलेज मधला आपला बेंच... ऑफिस मधली तशी कोणालाही न आवडणारी पण आपल्याला मात्र तीच हवी असणारी कोपऱ्यातली एकाकी जागा... प्रत्येकाच्या आपल्या अशा खास जागा असतात नं.. जिथे आपण फक्त आपले असतो.. स्वतः पुरता.. स्वार्थी म्हणूयात हवं तर , पण तिथे आपल्याला कधीच sharing  नको असतं... घरातल्या त्या खिडकीत कधी चुकून आई जरी जरा जास्त वेळ रेंगाळली तरी होणारी मनाची होणारी चलबिचल पार शाळा कॉलेज सुटल्यावरही तिथल्या आपल्या जागेवर रेंगाळत असते आणि म्हणूनच कदाचित १०-१२ वर्षांनी होणाऱ्या गेटटुगेदर मध्ये प्रत्येक जण आधी आपला बेंच पकडतो हो नं??
            आपल्या मनाचंही असंच असतं नं.... आपला कोष आपणच आपल्या भोवती विणलेला.. काय नसतं ह्या कोशात, आपली मतं, आपले निर्णय, आपली स्वप्न, आपल्या ठेचा, आपले हट्ट ...आपल्या आठवणी आणि त्याला धक्काही लागलेला सहन नं होणारे नाजूक आपण... वयाच्या कुठल्यातरी टप्प्यावर हे हवंहवंसं आपलंपण आपल्याला इतकं आवडायला लागतं कि त्याबाहेरच्या जगाचा सहज विसर पडावा... त्यातून बाहेर पडणं अगदीच कंटाळवाणं... आळसावतो तिथेच.. पण वेळ आळसावत नाही ती पुढे जात राहते आणि आपण मात्र आपल्याला कवटाळत राहतो.... मरेपर्यंत...
        नवीन घरात शिफ्ट होताना आपण आपली खिडकी नाही नं घेऊन जात तिथे... नव्या जागी नवा कोपरा आपला होतो.. तिथल्या बाल्कनीतला झोपाळा आता आपली हितगुज  ऐकणार असतो... पण जुन्या अंगणातला पार.. तोही असतोच कि सोबत... आपला कम्फर्ट झोन आपणच वाढवायचा असतो नं...पळवाटा नं शोधता लढायचं असतंच नं ... तिथल्या तिथे आळसावत रेंगाळण्यापेक्षा आभाळ कवेत घेऊन उंच उडायचं असतं.. नाही का?

Thursday, January 4, 2018

जन्म


निर्मितीचा कुठलाही क्षण  हा नेहमीच उत्साह आनंदाने भरलेला असतो नं.. आणि ती निर्मिती एखाद्या जिवंत गोष्टीची असेल तर?? मग ते छोटूस रोपटं असो किंवा तेवढंच छोटू बाळ.. कशी गंमत असते बघ, जाणीवपूर्वत एक बीज रोवलं जातं, मातीच्या थरात त्याला जपलं जातं, गोंजारलं जातं.. आणि वाट पहिली जाते ती त्याच्या अंकुरण्याची... काळ्याभिन्न मातीतून इवलासा हिरवट कोवळा कोंब फुटला कि काय समाधान वाटतं काय सांगू... मखमली स्पर्शाचा तो नाजूक देठ जणू  मान उंचावून जगाला सांगतो  "मी आलोय, माझी दखल घ्या"...हीच तऱ्हा नवजात शिशूची फरक इतकाच कि झाडांना बोलता येत नाही आणि ह्या छोटू बाळांना रडण्याशिवाय दुसरं काही येत नाही. पण खरं सांगा लेबर रूमच्या बाहेर येरझाऱ्या घालणाऱ्या आप्तांसाठी ह्या चिमुकल्याच्या पहिल्या ट्याहाँपेक्षा जास्त गोड काही असतं का.. ती असते नांदी येणाऱ्या अगणित सुखांची, अमाप आनंदाची आणि हो औत्सुक्याची सुद्धा. जन्माला आलेला हा नवा जीव आपल्यासोबत असंख्य नाती जन्माला घालतो.. जबाबदारीची , प्रेमाची , रागालोभाची नाती... नाती आवर्तनाची.. एका ठराविक वयाचा टप्पा ओलांडला कि पिढ्यांच्या स्थित्यंतरात ह्या नात्यांची जबाबदारी कळायला लागते. आपल्या ओंजळीतलं दान नव्या पिढीला सुपूर्त करताना जरासं धास्तावयला होतंच आणि ह्यात भर घालते ती  आजूबाजूची बदलत जाणारी परिस्थिती. आपण मध्यावर आलो असताना एका नवीन जीवाचा सुरु होणार प्रवास काळजीत टाकतो तो असा.. आत्ताच जगात आलेल्या ह्या पिल्लाला आपण काय काय देणं लागतो आणि नक्की कशाकशाचा प्रवास आपण आपल्यापाशीच संपवायचा ह्या विचारात असताना  मांडीवर बसून हि नवी जबाबदारी मात्र मजेत खेळात असते ..की आपल्याला वाकुल्या दाखवत असते देव जाणे.. नवनिर्मितीचा हा प्रत्येक क्षण नितळ असतो हे मात्र नक्की..

Monday, January 1, 2018

टिपकागद

टिपकागद.. भल्या बुऱ्या अनुभवांचा.. आठवणींचा.. जाणीवांचा टिपकागद... आपल्याही नकळत दिवस सरतात, वर्ष संपतात, काहीही न घडता हातोहात फसवत क्षण हातातून निसटतात पण तरी दरवेळी एक नवा दिवस उगवतोच... कोरा करकरीत.. अगदी ह्या टिपकागदासारखा... कालपरवाच एक जुनं वर्ष संपलं. एकसुरी जगलेल्या एका वर्षाचा हाही एक दिवस.. शेवटचा.. शेवट साजरा करण्याचा दिवस... कशी गंमत असते नं, एरवी काहीतरी संपायला आलं कि माणूस अस्वस्थ होतो , नाराज होतो क्वचित दु:खी सुद्धा पण ह्या सरत्या काळाला जो कधीही परतून येणार नाही त्याला निरोप देताना मात्र जल्लोष.. मजा आहे नं .. सतत निमित्त शोधात असतो आपण .. हसण्याचे ,रडण्याचे, काळजीचे आणि हो प्रेमाचेही... सगळी जगण्याची निमित्तं.. आयुष्य सेलिब्रेट करण्याची निमित्तं.... रोज नव्याने समोर आलेला हा कोरा कागद मावळतीला नव्या रंगात माखण्याचं निमित्तं...  रंग काही असतोच आणि इंद्रधनुही.. आपण फक्त तो टिपून घ्यायचा.. जपून ठेवायचा... भरजरी जगणं ह्यापेक्षा निराळं ते काय... हो नं !!

क्या करोगे?

गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...