दिवस असा उतरणीला लागला कि प्रवास नकोसा होतो बयो. एक अनामिक ओझं मानगुटीवर असण्याचा भास सतत छळत असतो बघ. त्यात भर म्हणजे आजूबाजूचं सगळं जग विसाव्याला पोहोचत असताना तुम्ही मात्र कुठल्याश्या अनोळखी जगातून अधांतरी प्रवास करत असता. आणि हा प्रवास तुझ्यापर्यंत घेऊन येणार असेल तर मग विचारायलाच नको. आपलं इथे कोणीही नसण्याची अधांतरी जाणीव दुपटीने अधोरेखित करणारा हा हरवलेला प्रवास...तू निघून गेल्यानंतर माझंच घर शोधताना आजही तितकंच हरवायला होतं मला.. इतकं कसं ग परकं होत गेलं सगळं.. अचानक कि अगदी सवडीने अनोळखी होतं गेले मी मलाच...मलाच न कळणाऱ्या वेगानं. तसं तर मला न उमगलेलं बरंच मोठं ओझं घेऊन तुझ्याच उंबऱ्याशी थबकलेय आज ...तुझी परतण्याची वाट बघत.. आणि स्वागताला नेमकी हि कातरवेळ... जीवघेणी.. अस्वस्थ.. हुरहुरती शापित कातरवेळ.. घराघरातून दिवेलागण होत असताना मी मात्र उंबरठ्यातच अडखळलेली... शुभंकरोतीचे सूर आजूबाजूला ऐकू येत असताना माझ्या काळजात मात्र जीवघेणी भैरवी निनादतेय. पाणावलेल्या डोळ्यांना अंगणातूनच जाणवतेय ती घरभर पसरलेली उदासीनता, दिवेलागणीला बगल देऊन सरळ घरात घुसलेला अंधार आणि सोबतीला आजूबाजूचे सगळे कोलाहल दूर सारून जीव कासावीस करणारी शांतता.. बयो असं दिस कलल्यावरचं एकटेपण नको ग पदरात टाकूस...
माझ्या येण्याने घराला आलेली जाग शेजारच्या घरानीही टिपली असावी कदाचित म्हणूनच कोणा बाईमाणसाची चाहूल समोरच्या ओट्यावर पाण्याची कळशी आणि कपभर दूध ठेऊन अलगद विरून गेली... आणि तिच्याही नकळत मला जागं करून गेली.. चाचपडणारी पावलं नकळत माजघराकडे वळताहेत आता आणि त्याही पल्याड असलेलं तुझं देवघर तितक्याच आर्ततेने ओढ लावतंय...अवघा काळोख दाटून आलाय.. गर्द रात्रीचा कुठलासा प्रहार हा.. जो तुझ्या नसण्याने जरासा लांबलाय.. देवघरात मंद तेवती समयी आणि कधीकाळी गंधाळल्या धुपाचा घुटमळता सुवास... ग्वाही देताहेत तुझ्या असण्याची...तुझ्या सोबतीची... घरभार पसरल्या निराशेचा हाच काय तो दिलासा गं बयो...बस हि रात्र मात्र आता सराया हवी... कुठल्याश्या सांजेला सुरु होणारा हा अधांतरी प्रवास पहाटेच्या वेशीवरतरी किमान संपायला हवा... अन संपता संपता हरवलेलं सारं सारं मला तुझ्या ओंजळीत गवसायला हवं बयो.. त्यासाठी का असेना तुला परतायला हवंय बयो.. परतायला हवंय..

सये आठवली... दर्जा... दर्जाच. 👍
ReplyDelete