निर्मितीचा कुठलाही क्षण हा नेहमीच उत्साह आनंदाने भरलेला असतो नं.. आणि ती निर्मिती एखाद्या जिवंत गोष्टीची असेल तर?? मग ते छोटूस रोपटं असो किंवा तेवढंच छोटू बाळ.. कशी गंमत असते बघ, जाणीवपूर्वत एक बीज रोवलं जातं, मातीच्या थरात त्याला जपलं जातं, गोंजारलं जातं.. आणि वाट पहिली जाते ती त्याच्या अंकुरण्याची... काळ्याभिन्न मातीतून इवलासा हिरवट कोवळा कोंब फुटला कि काय समाधान वाटतं काय सांगू... मखमली स्पर्शाचा तो नाजूक देठ जणू मान उंचावून जगाला सांगतो "मी आलोय, माझी दखल घ्या"...हीच तऱ्हा नवजात शिशूची फरक इतकाच कि झाडांना बोलता येत नाही आणि ह्या छोटू बाळांना रडण्याशिवाय दुसरं काही येत नाही. पण खरं सांगा लेबर रूमच्या बाहेर येरझाऱ्या घालणाऱ्या आप्तांसाठी ह्या चिमुकल्याच्या पहिल्या ट्याहाँपेक्षा जास्त गोड काही असतं का.. ती असते नांदी येणाऱ्या अगणित सुखांची, अमाप आनंदाची आणि हो औत्सुक्याची सुद्धा. जन्माला आलेला हा नवा जीव आपल्यासोबत असंख्य नाती जन्माला घालतो.. जबाबदारीची , प्रेमाची , रागालोभाची नाती... नाती आवर्तनाची.. एका ठराविक वयाचा टप्पा ओलांडला कि पिढ्यांच्या स्थित्यंतरात ह्या नात्यांची जबाबदारी कळायला लागते. आपल्या ओंजळीतलं दान नव्या पिढीला सुपूर्त करताना जरासं धास्तावयला होतंच आणि ह्यात भर घालते ती आजूबाजूची बदलत जाणारी परिस्थिती. आपण मध्यावर आलो असताना एका नवीन जीवाचा सुरु होणार प्रवास काळजीत टाकतो तो असा.. आत्ताच जगात आलेल्या ह्या पिल्लाला आपण काय काय देणं लागतो आणि नक्की कशाकशाचा प्रवास आपण आपल्यापाशीच संपवायचा ह्या विचारात असताना मांडीवर बसून हि नवी जबाबदारी मात्र मजेत खेळात असते ..की आपल्याला वाकुल्या दाखवत असते देव जाणे.. नवनिर्मितीचा हा प्रत्येक क्षण नितळ असतो हे मात्र नक्की..

आह ! खूप सुंदर , रुचे !
ReplyDelete