Sunday, March 31, 2019

प्रवास

घाटाचा नागमोडी रस्ता... रात्रीचा दुसरा प्रहार सुरु असावा.. रस्त्यावर वाहतूक अगदीच तुरळक म्हणजे तासाभराने एखादी गाडी दिसावी अशी... हा घाट म्हणजे तसा आडवाटेचाच.. थोडासा शॉर्ट कट म्हणून निवडलेला.. आणि कदाचित म्हणूनच कुटुंबासोबत मनसोक्त चार दिवस कोकणात धमाल करून पार्टीच्या प्रवासाला निघालेल्या त्या कुटुंबप्रमुखाच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती दोन्ही एकाचवेळी दाटलेली.. आणि का नसावी भीती.. गाडीत बायका पोरी आणि वेळ हि अशी किर्रर्र काळोखी.. नाही म्हणायला सोबतीला मित्र होता.. धीर द्यायला आणि काळजी वाटून घायला.. आणि ड्राइवर?? तो तसा देवमाणूस.. गेले चार दिवस त्याच्या कुटुंबातीलच एक वाटावा इतका एकरूप झालेला.. पण आता त्यालाही जरा काळजी वाटायला लागलेली आणि कुठेतरी अपराधी भाव पण.. उगाच हा शॉर्ट कट घेतला.. पण नेहमी थोडी तर वर्दळ असते.. आज अगदीच सामसूम कशी .. तसा निघायला पण उशीरच झाला आणि नेमकी रस्त्यात गाडी बिघडली.. नाहीतर आतापर्यंत मुक्काम गाठला असता.. सगळेच आपापल्या विचारात..
      ह्या सगळ्यात तीपण होती.. अडनिड्या वयातली.. लहानशी शाळकरी पोर... इतर सगळे वेगवेगळ्या विचारात असताना हिचं भावविश्व मात्र वेगळीच गोष्ट विणत होतं.. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातली ती त्यामुळे अगदी सातच्या आत घरात नसलं तरी रात्रीच्या ह्या वेळेला घराबाहेर असण्याची तिची हि पहिलीच वेळ.. तिच्या टपोऱ्या डोळ्यात ती साठवून घेत होती तो गारेगार अंधार.. गाडीसोबत पळणारी एकरंगी झाडं आणि त्यापाठोपाठ सुरु असलेला चंद्राचा लपंडाव... तिच्यासाठी सारंच मजेशीर आणि भीतीचा लवलेशही नसलेला अनुभव... घाटाचा रस्ता.. एका बाजूला चांदण्यात न्हाता डोंगर आणि दुसरीकड़े अंधार पोटात मिरवणारी दरी... धडकी भरवणारी.. तिला मात्र ओढ लावत होतं ते  दरीत पसरलेलं लखलखतं चांदण्यांनी गच्चं भरलेलं आभाळ.... एखाद्या वळणावर अचानक दरीला लपवून समोर पसरलेलं दुधाळ माळरान.. अडनिड्या वयात होती  ती.. नव्या अनुभवाला सामोरं जात होती .... निसर्गाच्या नव्या रूपाशी ओळख करून घेत होती...  'मनस्वी' तिचा जन्म होत होता... ती घडत होती आणि ह्या नव्या तिला आशीर्वाद देण्यासाठी आतुरलं होतं ते हसऱ्या चांदण्यांनी भारलेलं भरगच्चं आभाळ... तथास्तु...

No comments:

Post a Comment

क्या करोगे?

गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...