बयो , ह्या लॉक डाऊन मध्ये सगळं कसं स्तब्ध..थांबलेलं.. तरी सतत जाणवत राहतो एक विलक्षण वेग ... वरवर बघितलं तर आजूबाजूला साधं झाडाचं पान पण हलत नाही तरी क्षणक्षणाला काहीना काही बदल घडतोय हि जाणीव मनात घर करतेय.. जो तो जागच्या जागी बांधला गेलाय.. स्टॅचू च्या खेळासारखा तरी प्रत्येक जण स्वैर .. आजवर कधीही न अनुभवलेल्या प्रांतातला मुक्त वावर सगळ्यांचाच .. कोणी कंटाळलंय.. कोणी दमलंय... तर कोणी हाही एक नवा अनुभव म्हणून साजरं करतंय आयुष्य .. कशी गंमत असते ना.. जितकी माणसं तितक्या तऱ्हा . .. सहज विचार आला मनात..नेमकं हे सगळं सुरु व्हायला आणि उन्हाळ्याचा काळ आला .. मुळातच रुक्ष , नकोसा आणि एक गंभीर असा स्वभाव ल्यायलेला हा ऋतू.. एरवी ह्या उन्हाळ्यात सहसा सावलीला धावणारं जग आज घराच्या चार भिंतीतल्या सुरक्षित सावलीला कंटाळलंय.. सहज हं , अगदी सहज विचार कर हा सगळ्या कठीण काळ पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येता तर ... पावसाळ्याच्या उत्साही हिरव्यागार रंगाने धुतलं असतं का गं हे मनावरचं मळभ कि आभाळभर पसरलेला काळपट करडा रंग अजूनच उदास करून गेला असता .. हिवाळ्यात येता हा काळ तर कदाचित जरासा सुसह्य झाला असताही पण तरी कधी सरणार हि वेळ ह्याची खात्री नाही तोवर हि अनिश्चितता अस्वस्थ करणार हे नक्की... बघायला गेलं तर रोजच्या जगण्याला फारशी तोशिष नाही.. तरी खोलवर कसली तरी भीती मूळ धरतेय... ह्या अधांतरी जगण्याची सवय व्हायला नको बयो बस एवढंच...
विलक्षण !
ReplyDelete