Tuesday, July 21, 2020


रानोमाळ भटकणारी पावलं आपसूक एखाद्या गर्द  सावलीला थबकावी तशी तुझ्यापाशी येऊन विसावले बघ बयो..  तुझा तरी असा कुठला गं माग ... पाऊलवाटा शोधत..  त्यावर आपल्या पावलांचे ठसे उमटवत..  तुझ्या पावलांना गिरवत इथवर आलेय.. तुझ्यापाशी..  दिवस उतरणीला लागल्यावर वाटलं इथेच तुझ्या अंगणात तुझ्या विना संपणार हा प्रवास माझा ... . पण नाही तसं नव्हतं..  कधीच.. तुलाही ठाऊक होतंच कि....संध्येच्या वेशीवर नांदी होत होती नव्या प्रवासाची.. शुभशकुनाची वेळ म्हणायचीस ना गं ह्या किरमिजी अंधुक प्रकाशवेळेला... मी मात्र हट्टाने उष्टावलेली वेळ म्हणते .. ना धड प्रकाश ना अंधार.. अधांतरी वेळ आणि तशीच काहीशी मी तुझ्या दाराशी.. तुझ्या घराच्या उंबरठ्याशी .. तू नसताना.. तुझं घर मात्र फार सुंदर गं  बयो .. गावाबाहेर राहून गावाशी नाळ जोडलेलं .. हाकेच्या अंतरावर अवघा गाव उभा  पण अंगणाच्या वेशी आत पाय ठेवणारं  माझ्या शिवाय आगंतुक कोणी नाही..  अंतर ठेऊन माणसं जोडली बघ.... मला कधीच न जमलेलं हे अजून एक..... तुला सांगू तुझ्या घराला नं  तुझा गंध येतो.. खरपूस भाजक्या मातीचा.. ओलसर आभाळाचा.. हिरव्या रानाचा .. अन सोबतीला असतो मंद  प्रकाश ..   तू नसताना ह्या कोऱ्या सांजेला तुझ्या  तुळशीपाशी तेवणाऱ्या शांत  दिव्याचा आश्वासक प्रकाश तुझ्यासारखा ... अंधाराची काजळी अजूनच गर्द  होतेय बयो.. अन सोबतच जवळ येतेय तू  परतण्याची वेळ... कोणालाही बांधील नसलेली तू  ह्या  घराशी मात्र एकरूप आहेस हे जाणवतंय बयो .. तुझा वावर जाणवतोय .. तुझ्या येण्याची हे घर वाट बघतंय हे जाणवतंय.... काळ वेळाची  गणितं  मी कधीच मागे सोडलीत बयो... इतकंच काय पण आल्या पावलाचे ठसे सुद्धा पुसत आलेय इथवर .. न जाणो कोणाला ह्या वाटेचा मोह व्हावा.... शक्यताही नको.. आणि आता हा पुढचा नवा प्रवास...अनोळखी वाटांचा .. ह्या विचित्र मध्यंतरावर तुझा विसावा हवा बयो... पाऊलवाटांचे अर्थ चुकले तर समजून सांगायला तू हवीस बयो.. माझ्या नावाचं वळण कधी न कधी ह्या उंबरठ्याशी येणार हे जितकं तुला ठाऊक होतं तितकंच ह्या घरालाही बहुदा... अन कदाचित म्हणूनच तुझ्या तू असण्याचा माझा शोध इथेच  संपावा बयो..  तुझा शोध संपावा बयो... येशील ना!!!

No comments:

Post a Comment

क्या करोगे?

गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...